Deesha Education Foundation, Amravati, and Sanjivani Hospital, Yavatmal, Felicitate Families of 34 Eye Donors on World Eye Donation Day"
- anildeshmukh
- Jun 15
- 2 min read
दिशा एज्युकेशन फाऊंडेशन अमरावती व संजीवन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यवतमाळ
यांच्या तर्फे यवतमाळ मध्ये झाले नेत्रदात्यांच्या परिवारांचा सन्मान सोहळा
आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे आज एखाद्या व्यक्तीचे नेत्रदान केले तर, आज लेयरनुसार नेत्र प्रत्यारोपणामुळे एका नेत्रदानाने पाच ते सहा लोकांना फायदा होऊ शकतो. दृष्टी नसेल तर मेंदूचा विकास होत नाही. हे सुंदर जग प्रत्येकाला पाहता यावे, यासाठी नेत्रदानाची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज आहे. असे मत नेत्रशल्य चिकित्सा संघटना यवतमाळच्या अध्यक्षा डॉ. अपर्णा बाहेती यांनी व्यक्त केले.

हे सुंदर जग नेत्र गरजूंना पाहता यावे यासाठी ज्यांनी आपल्या प्रियजनांचे मरणोत्तर नेत्रदान दिशा एज्युकेशन फाउंडेशन अमरावती द्वारे संचालित दिशा आय बँक यवतमाळ मध्ये केले, अशा व्यक्तींचा सन्मान सोहळा दिशा एज्युकेशन फाऊंडेशन, अमरावती व संजीवन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेत्र चळवळीचे प्रेरणास्थान राजू जैन तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विजय कावलकर, डॉ. विजया कावलकर, डॉ. अपर्णा बाहेती, डॉ. अलोक गुप्ता, प्रा. काशिनाथ लाहोरे उपस्थित होते. डॉ. विजय कावलकर म्हणाले, नेत्रदान करणाऱ्यांची संख्या वाढविण्याची आज गरज आहे. मागील काही वर्षात फक्त 3४ नेत्रदान यवतमाळमध्ये झाले. खरं म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात ही चळवळ पुढे जायला हवी. नेत्रदानाच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत .नेत्रदान करणारा व्यक्ती पुढील जन्मी आंधळा जन्मतो, हा त्यातला सर्वात मोठा गैरसमज आहे.
दिशा एज्युकेशन फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री. स्वप्नील गावंडे यांनी नेत्रदानाची माहिती देताना सांगितले की मागील वर्षात संपूर्ण भारतात 38 ते 40 हजार नेत्रदान झाले. एकट्या महाराष्ट्रात 5086 डोळे नेत्रदानात मिळाले. 3097 नेत्र प्रत्यारोपण झाले. महाराष्ट्रात एकूण 78 नेत्रपेढी आणि 146 नेत्र प्रत्यारोपण केंद्रे आहेत. यावेळी प्रा. काशिनाथ लाहोरे, श्री. राजू जैन, डॉ. आलोक गुप्ता यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि नेत्रदानाची चळवळ आणखी गतिमान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. स्वप्निल गावंडे यांनी केले तर डॉ.श्रद्धा ढाकुलकर यांनी आभार मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कु. प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख, तसेच संजीवन हॉस्पिटलचे सहकारी श्री. निशिकांत नानवटकर, श्री. विशाल वीर, श्री. सिद्धार्थ अवसरमोल, श्री. वैभव वनारसे, श्री. राजेश चनाकेकर, सौ. वृषाली दरवेशवार यांचे भरपूर सहकार्य लाभले.
Comments