top of page

Deesha International Eye Bank Pays Tribute to 27 Eye Donor Families During World Eye Donation Day Celebration in Karanja Lad

दिशा एज्युकेशन फाऊंडेशन तर्फे कारंजा लाड येथे नेत्रदात्यांच्या परिवारांचे झाले सन्मान

 

नेत्रहीन गरजू लोकांना सुंदर जग पाहता यावे म्हणून कारंजातील दिशा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून जनजागृती करत आहे. ज्यामध्ये २७ नेत्रदात्यांचे मरणोत्तर नेत्रदान त्यांच्या परिजनांनी केले आहे. यामुळे कारंजातील नेत्रदान चळवळ ही इतरांना प्रेरणादायी ठरत आहे असे प्रतिपादन अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी केले. दिशा एज्युकेशन फाऊंडेशन आणि कारंजा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या नेत्रदाते कुटुंबीयांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी उ‌द्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारंजा एज्युकेशन सोसायटीचे सचिव अमलप्रभ चवरे तर प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ कॅन्सर रिलीफ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शार्दुल डोणगावकर, दिशा एज्युकेशन फाउंडेशनचे सचिव श्री. स्वप्नील गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ree

याप्रसंगी आपल्या प्रियजनांचे मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्या २७ परिवाराचा सन्मान करण्यात आला. त्यांना दिशा एज्युकेशन फाऊंडेशन कडून स्मृतिचिन्ह देण्यात आले. तसेच याप्रसंगी नेत्रदान कार्यात भरीव कामगिरी केलेल्या संस्थांचा व कार्यकर्त्यांचा सुद्धा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. शार्दुल डोणगावकर व श्री. स्वप्नील गावंडे यांनी नेत्रदानाची गरज व नेत्रदान प्रक्रियेविषयी उपयुक्त अशी माहिती दिली. तर आपल्या अध्यक्षीय भाषणातून श्री. अमलप्रभ चवरे यांनी आपल्या स्वकीयांचे नेत्रदान करणाऱ्या कुटुंबाप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुशील देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन आशिष बंड यांनी केले. या कार्यक्रमामध्ये डॉ. श्रद्धा ढाकुलकर, कु. प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. निशांत देशमुख, श्री. प्रज्वल गुलालकरी, श्री. अनिल देशमुख आदी कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.

 

या पार्श्वभूमीवर दिशा एज्युकेशन फाऊंडेशन अमरावती द्वारे संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये अशा व्यक्तींचा सन्मान सोहळा येथे पहिल्यांदा आयोजित करण्यात करण्यात आला होता. ज्यामध्ये सक्रियपणे काम करणाऱ्या डॉक्टरांचा तथा समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला.

 

भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता. नेत्रदानासाठी संपर्क: ७३७८६५६१४५, ७३७८६५६१४४, ९८९९८९८६६७


Comments


bottom of page