top of page

एका निर्णयातून उजळले अनेक जीवन: नेत्रदान पंधरवडा २०२६ निमित्त नेत्रदाता कुटुंबीयांचा सन्मान

Writer: Pranali Chambhare
Pranali Chambhare
Sep 1
2 min read

नेत्रदान पंधरवडा २०२६ निमित्त दिशा इंटरनॅशनल आय बँक आणि संजीवन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदाता कुटुंबीयांचा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.


Eye Donor Family Felicitation Program Yavatmal 2026
Eye Donor Family Felicitation Program Yavatmal 2026

नेत्रदान हा केवळ एक निर्णय नसून, एखाद्याच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणण्याची संवेदनशील भावना आहे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर दुःखाच्या प्रसंगातही नेत्रदानाचा निर्णय घेणाऱ्या कुटुंबीयांचे योगदान खरोखरच प्रेरणादायी आहे. अशाच नेत्रदाता कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.


या कार्यक्रमाला डॉ. विजय कावलकर, डॉ. सुनील अग्रवाल, श्री. सुरेश राठी, प्रा. काशिनाथ लाहोरे, डॉ. अलोक गुप्ता आणि श्री. राजेश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते नेत्रदाता कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.


यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विजय कावलकर यांनी नेत्रदान करणाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज व्यक्त केली. ही चळवळ संपूर्ण जिल्ह्यात अधिक व्यापक होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. नेत्रदानाबाबत समाजात आजही अनेक गैरसमज असून, “नेत्रदान करणारी व्यक्ती पुढील जन्मी आंधळी जन्मते” हा त्यातील एक मोठा गैरसमज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


दिशा ग्रुप च्या कार्याची ओळख


यावेळी दिशा ग्रुप चे संस्थापक श्री. स्वप्नील गावंडे यांनी दिशा ग्रुप च्या कार्याचा प्रवास आणि नेत्रसेवेच्या क्षेत्रात संस्थेची भूमिका याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. नेत्रदानाबाबत समाजात जनजागृती निर्माण करणे, गरजूंपर्यंत नेत्रसेवेचा लाभ पोहोचवणे आणि या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांविषयी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नेत्रदानाची गरज आणि त्यातून अनेकांच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या आशेचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.


यावेळी प्रा. काशिनाथ लाहोरे, डॉ सुनील अग्रवाल. श्री सुरेश राठी, डॉ. अलोक गुप्ता आणि श्री राकेश शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नेत्रदानाची चळवळ आणखी गतिमान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


नेत्रसेवेला आधुनिक साधनांची जोड


नेत्रसेवेच्या कार्याला अधिक सक्षम करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल यावेळी उचलण्यात आले. नवीन वैद्यकीय उपकरणाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञान आणि आवश्यक वैद्यकीय सुविधांची जोड मिळाल्याने नेत्रसेवेची गुणवत्ता आणि कार्यक्षमता अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. या सुविधेमुळे भविष्यातील नेत्रसेवा आणि उपचारांच्या कार्याला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली चांभारे यांनी केले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. हिमांशू बंड आणि श्री. अनिल देशमुख तसेच संजीवन हॉस्पिटलचे सहकारी श्री. निशिकांत नानवटकर, श्री. विशाल वीर, श्री. सिद्धार्थ अवसरमोल, श्री. वैभव वनारसे, श्री. गुंजन राऊत आणि सौ. वृषाली दरवेशवार यांचे सहकार्य लाभले.


  • Dr. Vijay Kawalkar & Dr. Vijaya Kawalkar
  • Eye donor Family
  • Eye Donor Family
  • Eye Donor Family
  • Felicitation Program
  • Felicitation Program

नेत्रदान पंधरवडा २०२६ निमित्ताने दिशा इंटरनॅशनल आय बँक आणि संजीवन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल & रिसर्च इन्स्टिटयूट यांचा नेत्रदानाबाबत जनजागृती आणि नेत्रसेवा अधिक व्यापक करण्याचा हा प्रयत्न यापुढेही असाच सुरू राहणार आहे.


नेत्रदानाचा संकल्प करा… आपल्या जाण्यानंतरही कोणाच्यातरी आयुष्यात प्रकाश राहू द्या.

Comments


bottom of page