“AMC School Eye Checkup Camp by Deesha Group: A Visionary Step for Children's Eye Health”
- anildeshmukh
- Mar 24
- 1 min read
दिशा ग्रुपच्या फिरत्या नेत्र चिकित्सालय द्वारे म.न.पा. मराठी शाळा, निंभोरा, अकोली आणि शाळा क्रं. ७ बडनेरा येथे एकूण १०८ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी
दिशा एज्युकेशन फाउंडेशन, अमरावती संचालित फिरत्या नेत्र चिकित्सालयाच्या माध्यमातून दिनांक १९ मार्च २०२५ रोजी अमरावतीतील म.न.पा. मराठी शाळा निंभोरा, म.न.पा. मराठी शाळा अकोली आणि म.न.पा. उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा क्र. ७, बडनेरा येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तिन्ही शाळांतील एकूण १०८ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.

या तपासणी दरम्यान विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य तपासण्यात आले आणि आवश्यकतेनुसार योग्य क्रमांकाचे चष्मे देण्यात आले. तसेच डोळ्यांची योग्य निगा कशी राखावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. काही विद्यार्थ्यांना पुढील तपासणीसाठी स्थानिक धर्मदाय नेत्र रुग्णालयात पाठवण्याची शिफारस करण्यात आली.
शिबिरादरम्यान दिशा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी नेत्रदानाचे महत्त्व समजावून सांगत, समाजातील गैरसमज दूर करण्याचे कार्य केले. अंधत्व ही भारतातील मोठी समस्या असून, एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंधांना प्रकाश मिळू शकतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असलेल्या व्यक्तींनाही नेत्रदान करता येते. तसेच चष्मा वापरणारे आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींचे नेत्रदान देखील शक्य आहे.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी म.न.पा. मराठी शाळा निंभोरा येथील मुख्याध्यापक श्री. गोपाळ अभ्यंकर, म.न.पा. मराठी शाळा अकोली येथील मुख्याध्यापक श्री. मधुसूदन चव्हाण आणि म.न.पा. उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा क्र. ७, बडनेरा येथील मुख्याध्यापिका सौ. सुनंदा मेहेर तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. दिशा ग्रुपचे श्री. स्वप्नील अरुण गावंडे, नेत्र चिकित्सक कु. प्रणाली चांभारे, श्री. हिमांशू बंड, श्री. अनिल देशमुख आणि अन्य कार्यकर्त्यांनी या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.
दिशा ग्रुपच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे डोळ्यांचे आरोग्य तपासण्यासोबतच, नेत्रदानाबाबत जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडून आले.
Comments